महाराष्ट्रातील दगडादगडाला पाझर फोडण्याचे काम बाबासाहेबांनी केले: करमाळकर
पुणे : ”एका शंभर वर्षांच्या विद्यापीठाचा गौरव करण्यासाठी 70 वर्ष जुन्या असणाऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना बोलावलं आहे, ही गोष्ट माझ्यासाठी भाग्याची आहे,” असे गौरवोद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर यांनी काढले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गुरूवार (ता. 29) जुलै रोजी वयाची 99 वर्षे पुर्ण केली असून, त्यांनी शंभरीत प्रवेश केला आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र किर्ती सौरभ प्रतिष्ठान, पुणे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी महोत्सव समिती, पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात करमाळकर बोलत होते.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे, उद्योजक पुनीत बालन, भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त अमित वसिष्ठ, अॅड. विशाल सातव, डाॅ. प्रसन्न परांजपे, अभिषेक जाधव, विनोद सातव आदी उपस्थित होते. करमाळकर पुढे म्हणाले, ”महाराष्ट्रातील दगडादगडाला पाझर फोडण्याचे काम बाबासाहेबांनी केले आहे. त्यांनी लोकांच्या नसानसामध्ये शिवचरित्र जागविण्याचे काम केले आहे.”
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ”बाबासाहेब पुणेकर आहेत, ही आपल्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. शिवचरित्रामार्फत छत्रपतींना घराघरात आणि मनामनात पोहचविण्याचे काम बाबासाहेबांनी केले आहे. त्याचीच एक उतराई म्हणून महाराष्ट्र किर्ती सौरभ प्रतिष्ठान, पुणे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी महोत्सव समिती, पुणे वर्षभर विविध कार्यक्रम राबविणार आहे. या समितीचे अध्यक्षपद माझ्या वाट्याला येणं ही सन्मानाची गोष्ट आहे. यामार्फतच एक भव्यदिव्य राष्ट्रीय स्वरूपाचा कार्यक्रम कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर करण्याचा मानस आहे. समस्त पुणेकरांच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करून शुभेच्छा देतो.”
सदानंद मोरे म्हणाले, ”शिवचरित्र अनेकांनी लिहिले आहे. भविष्यात अनेकजण लिहितीलही. शिवचरित्र लिहिण्याचा अधिकार कोणाला आहे? आपल्या परंपरेत अधिकार नावाची गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बाबासाहेबांनी तो अधिकार कमावला आहे. छत्रपती संभाजी महाराज, चिमाजी आप्पा पेशवे यांनी आपल्या देशातून पोर्तूगिजांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. तीच परंपरा पुढे यशस्वी करण्याचे काम बाबासाहेबांनी केले आहे. यातूनच त्यांना शिवचरित्र लिहिण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. शिवचरित्र सगळ्याच फाॅर्ममध्ये करत तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम त्यांनी केले. बाबासाहेब स्वतः शिवकाळात जातात. ते एकटे जात नाहीत तर आपल्यालाही घेऊन जातात.”
यावेळी चारुदत्त आफळे यांचे कीर्तन झाले. दादरा-नगर हवेली मुक्तीसंग्रामात बाबासाहेब यांचा सहभाग कसा होता यावर आफळे यांनी प्रकाश टाकला. अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने दत्तोपंत हडप गुरुजी यांनी मंत्रपठण केले.
यावेळी बोलताना बाबासाहेब म्हणाले, ”एका व्याख्यानमालेसाठी मुंबईत गेलो होतो. व्याख्यान झाल्यानंतर एक काॅलेजमधील मुलगी जवळ येऊन मला म्हणाली, तुम्ही शिवचरित्र खुप छान सांगता पण छत्रपतींच्या कुठल्या गोष्टींचे अनुकरण करता का? असे म्हणताच मी चक्रावलो. मला काही सुचले नाही. मी म्हटले याचे उत्तर मी तुम्हाला नंतर देतो. त्यानंतर मी बराच विचार केला. आणि त्यानंतर मी विचार करू लागलो अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यांचे आपण अनुकरण करतो. छत्रपती आपल्या रक्तात नसानसात भिनायला हवेत. मी आजपर्यंत छत्रपतींप्रमाणे माझ्या जीवनात दिलेला शब्द व दिलेली वेळ या दोन्ही गोष्टी आयुष्यभर काटेकोरपणे पाळत आलो आहे. अहंमपणा बाळगू नका. नेहमी हसत रहा. आई-वडिलांची सेवा करा. सर्वांवर प्रेम करा. शिवचरित्र वाचा, शिवचरित्र तपासा, शिवचरित्राचे अनुकरण करा” असा संदेश शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिला. तसेच यावेळी बाबासाहेबांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणीही सांगितल्या.
याप्रसंगी बाबासाहेब यांचे 100 दिव्यांनी औक्षण करण्यात आले. विद्यापीठाकडून डॉ. सदानंद मोरे व कुलगुरूंनी बाबासाहेब यांचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. तसेच डाॅ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांवर काढलेल्या विशेषकांचे प्रकाशन यावेळी झाले. कोरोनाचे शासकीय नियम पाळून कार्यक्रम झाला. सुत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर अॅड. विशाल सातव यांनी आभार मानले.
गानकोकिळा लतादीदींच्या शिवशाहीरांना अनोख्या शुभेच्छा…
कार्यक्रमादरम्यान गानकोकीळा लता मंगेशकर यांनी फोन करून बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, ”आज आपला शंभरावा वाढदिवस आहे म्हणून मी तुम्हाला इथून तुमच्या पायावर डोकं ठेऊन नमस्कार करते आणि देवाकडे मागते की तुमची तब्येत चांगली राहो. तुम्ही आम्हाला ११० वर्षे हवे आहेत, म्हणजे मी पण असेन त्या वेळेला.”
Comments are closed.